मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन 

ByTeam Malranexpress

August 31, 2026
mangalwedha water issue

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांची स्थिती गंभीर असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, तसेच टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. रविकिरण सुरेश कोळेकर यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार, मंगळवेढा यांना निवेदन देण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा तालुक्यात यावर्षी पावसासाठी सुरू होणे अपेक्षित असलेल्या कालावधीत अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने पावसाची सर्व नक्षत्रे कोरडी गेली असून त्यामुळे गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 

खरीप पिकांचे नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात 

पावसाअभावी तालुक्यातील खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

ad Ravikiran kolekar

कृष्णा नदीचे पाणी मंगळवेढा तालुक्यात सोडण्याची मागणी 

कृष्णा नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले तसेच वाहून जाणारे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मंगळवेढा तालुक्यात सोडण्यात यावे, अशी प्रमुख मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागू शकतो, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. 

याशिवाय शिरनांदगी, पडोळकरवाडी, लवंगी, नारोळी तसेच इतर साठवण तलाव पुढील काही दिवसांत तातडीने भरून घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करा 

मंगळवेढा तालुक्यातील ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, अशा भागात प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद आहे. 

पाच दिवसांत कार्यवाहीची मागणी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात एकूण सहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील पावसाची सद्यस्थिती लक्षात घेऊन दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, खरीप पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देणे, कृष्णा नदीचे पाणी उपसा सिंचन योजनेतून तालुक्यात सोडणे आणि विविध तलावांमध्ये पाणी साठवणे यांचा समावेश आहे. 

या निवेदनावर तातडीने कार्यवाही न झाल्यास मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी तसेच नागरिकांच्या वतीने शासन व प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.निविदेन देताना ॲड. रविकिरण कोळेकर, ॲड. राहुल घुले, दीपक भोसले, श्रीमंत केदार, संदीप पवार, सचिन पाटील, सिद्धाराम काकणगी, सुनिता अवघडे, बापू अवघडे, ॲड. महेश जानकर, ॲड. विजय पुजारी, तुळशीदास मुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.