माळरान एक्सप्रेस विशेष प्रतिनिधी / रड्डे:
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रड्डे येथील श्री. लक्ष्मीदेवी विद्यामंदिर या शाळेचा माजी विद्यार्थी मनोज रामचंद्र पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत संपूर्ण भारतातून ४९३ वी (All India Rank 493) रँक मिळवून गावाच्या आणि पंचक्रोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल उद्या, सोमवारी (दि. ९ मार्च) शाळेच्या वतीने एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे, मनोज पाटील हा याच शाळेचे माजी शिक्षक श्री. रामचंद्र पाटील यांचा सुपुत्र आहे. एका शिक्षकाच्या मुलाने आणि गावातीलच शाळेत प्राथमिक धडे गिरवलेल्या विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी मनोजची ही गरुडझेप अत्यंत प्रेरणादायी मानली जात आहे.

उद्या होणार भव्य सत्कार:
मनोज पाटील यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी श्री. लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, रड्डे येथे सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कवठेमहांकाळ-जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक (Dy. S. P.) मा. सचिन धोंडीबा थोरबोले आणि श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ, रड्डे चे अध्यक्ष अॅड. रविकिरण कोळेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या सत्कार समारंभास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव करावा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर उदयोन्मुख विद्यार्थ्यांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहन अॅड. रविकिरण कोळेकर, इंजनिअर दादा कोळेकर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, आणि माजी विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
